भारनियमना विरोधात शेकडो शेतकऱ्यांचा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा !
हिवरखेड दापोरी डोंगर यावली घोडदेव परिसरातील शेतकरी भारनियमनाने वैतागले !
दिवसा विजपुरवठा सुरू करण्यासाठी आंदोलनाचा इशारा !
मोर्शी तालुका प्रतिनिधी :- मोर्शी तालुक्यातील हिवरखेड 33 केव्ही उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या दापोरी डोंगर यावली सालबर्डी घोडदेव हिवरखेड बोपलवाडी इस्माइलपुर भागात अघोषित भारनियमनाने शेतकऱ्यांना वैतागून सोडले आहे. परिसरातील शेतकऱ्यांना दिवसा विजपुरवठा न करता कडाक्याच्या थंडीमध्ये रात्री वीज मिळत असल्याने हा वीज पुरवठा त्यांच्या जीवावर उठला आहे.ओलिताची सोय आहे; मात्र शेतातील मोटारपंप मनमानी भारनियमनाने चालत नसल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.
महावितरण कंपनीने भारनियमन सुरू केल्यामुळे आंबिया बहार घेण्यासाठी संत्रा झाडांना व शेती पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्री अपरात्री घराबाहेर पडावे लागत असल्याने जीव मुठीत घेत ओलित करावे लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे दिवसा भारनियमन न करता विजपुरवठा खंडित न करता दिवसा कायम वीज द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रुपेश वाळके यांच्या नेतृत्वात उप विभागीय अधिकारी, कार्यकारी अभियंता महावितरण यांच्या कार्यालयात शेकडो शेतकऱ्यांना सोबत घेऊन धडक मोर्चा काढून निवेदन देऊन करण्यात आली.
यावर्षी संत्राचा खरीप हंगाम अवकाळी पाऊस, अतिवृष्टीमुळे वाया गेला. मात्र त्याची कसर रब्बी हंगामातून काढण्याच्या दृष्टीने बळीराजा तयारीस लागला असतांना महावितरणकडून दापोरी हिवरखेड घोडदेव डोंगर यावली सालबर्डी भागामध्ये अचानक दिवसा विजपुरवठा खंडित करत रात्री तो देण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
अमरावती जिल्ह्यामध्ये सर्वच ठिकाणी शेतीसाठी दिवसा थ्री फेज वीज पुरवठा सुरू असतांना मोर्शी तालुक्यातील हिवरखेड उपकेंद्रांमध्ये भारनियमन करून चार दिवस रात्री आणि तीन दिवस दिवसा वीज मिळत असून महिन्यातून किमान सतरा दिवस हे रात्रीचे शेतकऱ्यांना वीज मिळनार असल्याने रात्रीच्या अंधारात त्यांना आपल्या पिकांना पाणी द्यावे लागत आहे. यादरम्यान साप, विंचूसह इतर हिंस्र प्राण्यांची दहशत असतांना सुद्धा जीवाची बाजी लावून पिकांना पाणी द्यावे लागत असल्याचे चित्र आहे. परिसरात सध्या बिबट्याची दहशत असून अनेक ठिकाणी त्याने प्राण्यांवर हल्ला करत त्यांचा जीव घेतला आहे. त्यामुळे महावितरणने शेतकरी हिताचा विचार करून वीज कंपनीने सद्या अघोषित भारनियमन थांबवावे व शेतकऱ्यांचे पीक वाचविण्यासाठी सहकार्य करावे अन्यथा शेतकऱ्यांच्या भावनेचा उद्रेक होवून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन भारनियमन थांबवावे अशी मागणी उप विभागीय अधिकारी रवींद्र पवार, कार्यकारी अभियंता, उप अभियंता महावितरण कंपनी यांना निवेदन देऊन करण्यात आली त्यावेळी उप विभागीय अधिकारी यांनी या विषयावर तोडगा काढण्यासाठी संबंधित विभागांची बैठक 5 जानेवारी रोजी तहसील कार्यालय मोर्शी येथे आयोजित केली असून त्यामध्ये तोडगा न निघाल्यास महावितरण कंपनी विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला त्यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अंकुश घारड, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष रुपेश वाळके, उपसरपंच कांचन कुकडे, प्रमोद दंडाळे, भगवत राऊत, अनिल कुकडे, मुकेश राऊत, प्रशांत समुद्रे, विशाल डेहनकर, प्रमोद देवघरे, निखिल देवताळे, अमोल बोडखे, महादेव पाटील, पावन गणोरकर, नंदकुमार ढोमणे, विजय ढोरे, वामन भडके यांच्यासह आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

